चिल्ला म्हणजे चाळीस. पूर्वीचे तबलावादक आपल्या साधनेचा रियाझ करण्यासाठी चाळीस दिवस सलग राेज ठराविक तास तबल्यामधील एखाद्या रचनेचा सराव करत असत. खंड न पडता व रियाझाचा वेळ कमी न करता ही साधना हाेत असे. या रियाझ परंपरेचे तबला चिल्ला असे नामकरण झाले. थिरकवाँ खाँसाहेबांनी असा चिल्ला व साधना ९ वर्षे सलग राेज १६ तास याप्रमाणे केलेली आहे.
तबला चिल्ला ही संकल्पना नाशिकमध्ये सर्वप्रथम सुरू झाली ती नोव्हेंबर २०१४ मध्ये. निमित्त होते नाशिकचे ज्येष्ठ तबलावादक पंडित कमलाकर वारे, जागतिक कीर्तीचे तबलावादक आणि आपल्या साथसंगतीने हजारो मैफली गाजवलेले नादसाधक पंडित नाना मुळ्ये, उस्ताद अहमदजान थिरकवा यांचे गंडाबंध शिष्य पंडित नारायण काका जोशी या तीन तबलावादकांच्या पंचाहत्तरीचे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य तबला साधनेत व्यतित केले त्या थोर तबलावादकांना त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त नाशिकच्या आदिताल तबला अकादमीने मानवंदना देण्याचे ठरवले आणि तबला चिल्ला या कार्यक्रमाचा उदय झाला. असंख्य तबलावादक स्वतःहून या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी आदिताल तबला अकादमीशी संपर्क करू लागले आहेत. आदिताल तबला अकादमी आणि या कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या नाशिककरांचे हे यश आहे. नाशिकमधील तबला चिल्ला ही साधना म्हणजे राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील साधकांसाठीही एक तालपर्वणीच असते.
फक्त तबलावादन असे कार्यक्रम तसे कमी हाेतात आणि जे हाेतात ते अत्यंत दिग्गज लाेकांचे; तेही दुर्मिळात दुर्मिळ. पण, खाँसाहेबांचा तबला त्यांचे शिष्य पं. नारायणराव जाेशी यांच्या रूपाने पुन्हा अनेकांना शिकता आला, अनुभवता आला. म्हणूनच या महान लाेकांपुढे नतमस्तक हाेण्याच्या भावनेने आदिताल तबला अकादमीच्या माध्यमातून नितीन वारे यांनी ‘तबला चिल्ला अखंड नादसंकीर्तन’ सुरू केले. हा कार्यक्रम म्हणजे फेस्टिव्हल नाही तर हे आहे साधनेचं सादरीकरणच. या ठिकाणी जे अनेक दिग्गज तबलावादनासाठी येतात त्यांची शस्त्रं-अस्त्रं या संकल्पनेपुढे गळून पडतात हे स्पष्ट दिसतं. कारण समाेर बसणारे सगळे दिग्गज आणि वाजवणारेही दिग्गज. त्यात ८ ते ८० वर्षांपर्यंतचे तबलावादक असल्याने शिक्षणाचे, विचारांचे आदानप्रदान हाेते. नाशिकच्या या कार्यक्रमात पं. किरण देशपांडे हे ८२ वर्षांचे ज्येष्ठ गुरू वादनासाठी आले हाेते. तबला चिल्लाचा धागा धरत तरुणांनाही लाजवेल असे वादन करत त्यांनी या साधनेवर कळस चढविला. थिरकवाँ खाँसाहेबांच्या स्मृतिनिमित्त जरी हा कार्यक्रम हाेत असला तरी संपूर्ण भारतातील तबल्याचा एक ‘फ्लेवर’ या ठिकाणी एेकायला आणि बघायला मिळताे. बनारस, दिल्ली, अजमेर, भाेपाळ, इंदूर येथील तबलासाधनेचं आदानप्रदान यानिमित्ताने हाेतं. अनेक जण त्रितालात सादरीकरण करतात, त्यामुळे ते एकसुरी हाेण्याची शक्यता असते. कारण चिल्ला म्हणजेच अखंड वादन. पण, म्हणूनच त्या सादरीकरणातील वैविध्य हेच तबला चिल्लाचं वैशिष्ट्य ठरतं. या तबला चिल्लासाठी नाशिकच नव्हे तर मुंबई, पुणे, सातारा, काेल्हापूर, जळगाव, धुळे, साेलापूर, ठाणे, आैरंगाबाद, लातूर अशा राज्यातील आणि राज्याबाहेरील शहरांमधूनही फक्त एेकण्यासाठी रसिक येत आहेत.
आदिताल तबला अकादमीच्या सहकार्याने नाशिकमध्ये 'तबला चिल्ला..अखंड नादसंकीर्तन’ ही संकल्पना सुरू झाली नाशिकमधील तबला चिल्ला ही साधना म्हणजे राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील साधकांसाठीही एक तालपर्वणीच असते.थिरकवाँ खाँसाहेबांच्या स्मृतिनिमित्त जरी हा कार्यक्रम हाेत असला तरी संपूर्ण भारतातील तबल्याचा एक ‘फ्लेवर’ या ठिकाणी ऐकायला आणि बघायला मिळताे. बनारस, दिल्ली, अजमेर, भाेपाळ, इंदूर येथील तबलासाधनेचं आदानप्रदान यानिमित्ताने होते.